Search
झरा
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
जलबिंदूंचे मंजुळ गाणे
आळवी आनंदवारा ..
तुझ्यासारखा वाहे झुळझुळ
नीळा सावळा झरा..
वाट काढूनि शांत वाहणे
हिरवाळी घेऊनि ..
हळूहळू ते पुढेच जाणे
मागे ना वळूनि ..
खडकांमधुनी तुझे चालणे
चुकवुनि पहारा...
तुझ्यासारखा वाहे झुळझुळ
नीळा सावळा झरा..
आवडते मज तुझे हासणे
घेऊनि वळणे चार..
जाता जाता उडवित मजवरि
थोडे धवल तुषार..
कधी दाखवित इंद्रधनूच्या
सप्तरंगी कडा..
तुझ्यासारखा वाहे झुळझुळ
नीळा सावळा झरा..
अबोल प्रीती, नसे उसळणे
प्रवाहात तू दंग
नाही रुसवा, नाही तांडव
आपुल्यामधे गुंग..
कधीतरी पण उफाळून ये
लाटांसारखा जरा...
तुझ्यासारखा वाहे झुळझुळ
नीळा सावळा झरा..
कोठून पाझर, कोठे जाणे
नाही तुजला चिंता..
आनंदाने गात वाहणे
विसरुनी साऱ्या जगता..
नेशील का रे तुझ्याबरोबर
सोडिन सर्व पसारा..
तुझ्यासारखा वाहे झुळझुळ
नीळा सावळा झरा..
विनिता धुपकर
Comentarios