Search
नभ
- Vinita

- Feb 18, 2020
- 1 min read
नभांगणात झाली गर्दी, खेळ चांदण्यांचा
लपंडाव रंगला, ढगांमागून शोधण्याचा..
लपून बसली ढगामागे, शुक्राची राणी
शोधा तिला अभ्रिका, अनुराधा, अश्विनी..
डोळे मिचकावतेय राणी, चंद्राकडे पाहून
सांगू नकोस कोठे मी, शुभ्र ढगाआडून..
चंद्र मग म्हणाला, माझ्यावर राज्य घेतो
पिंजून काढा नभांगण, मी आता लपतो..
साऱ्या जणी निघाल्या लगबगीने शोधित
चंद्र काही सापडेना, आल्या धापा टाकित...
दुसऱ्या दिवशी आला चंद्र, हरलात ना तुम्ही
वेड्यांनो काल अमावस्या, नसतोच नभी मी
विनिता धुपकर
Comments