top of page
Search

कमळ

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 18, 2020
  • 1 min read

चिखल-पाण्यात उभे आहे, ताठ मानेने पंकज

राष्ट्राच्या अभिमानाचा, मिरवित निरंतर ध्वज


विविध छटांच्या पाकळ्या, नाना रंगाचे कंज

भिन्न जाती धर्म एकता, आनंदे सामावी अंबुज .

चिखल-पाण्यात उभे आहे, ताठ मानेने पंकज..


पाने झोपून पाण्यावरती, उचलून धरती जलज

झाकून साऱ्या वेदनांना, हसरे दिसते नीरज

चिखल-पाण्यात उभे आहे, ताठ मानेने पंकज..


चमके कमळावरती मोती, दवबिंदूंचे थेम्ब सहज

दवबिंदू कि अश्रू पद्मा, पानावर ओघळे सरसिज..

चिखल-पाण्यात उभे आहे, ताठ मानेने पंकज..


पाकळ्यांची उघडून दारे, आसनस्थ लक्ष्मीचे तेज

भारतमाता दिसे आपुली, वंदन तिजला, सरोज..

चिखल-पाण्यात उभे आहे, ताठ मानेने पंकज..

राष्ट्राच्या अभिमानाचा, मिरवित निरंतर ध्वज..


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page