top of page
Search

गंध

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

अंधार दाटून आला

दिवसाच्या घरात

कृष्णमेघांची गर्दी

जमली आभाळात..


मोत्यांची माळ तुटावी

तशी सर आली

हिरवा चुडा वाजवीत

पाने डुलू लागली..


वसुंधरेने नाचवले थेंब

शहारत अंगावरती

ओल्या मातीचा पसरे

दरवळ आसमंती ..


ओढून मला नेले

मृदगंधाने पावसात

खेळवले हातावर थेंब

चेहराही झेली ओठात..


गुंतलेला सायलीचा गंध

मधूनच ओल्या केसांतून

सोडवेना मला माझ्या

श्वासांच्या स्पंदनांतून


परत येता आल्याचा चहा

खोलीभर पसरला गंध

आळवत त्याने पाऊस

मैफिलीत भरला रंग..


गंध थेट हृदयात नेण्याचा

नाकाला मिळाला मान

चेहऱ्याच्या मधोमध ऐटीत

मिरवत अव्वल स्थान..


 
 
 

Comments


bottom of page