Search
वेग
- Vinita
- Mar 18, 2020
- 1 min read
प्रत्येकाचा अगदी निराळा
वेग जगण्याचा
सापेक्ष तरीही
पुढे जाण्याचा..
सेकंद काटा पकडतो
मिनिटाला..
मिनिट काटा तासाला
तास धावतो दिवसांमागे
काळ धावतो युगांमागे
पृथ्वीच्या सूर्याभोवती घिरट्या
तिच्या वेगाने..
चंद्रही तिच्याभोवती
संथ गतीने प्रेमाने..
तुझा माझाही वेग
वेगवेगळा..
तुझा सावकाश चालण्याचा
माझा पळण्याचा गोंधळा
विचारांचा वेग
थांबता थांबत नाहीत
एका कड्यातून दुसरी कडी
साखळीचा अंत नाही
वेग मंदावतो म्हणे
वाढत्या वयाबरोबर
सारे काही सापेक्ष
आपल्या मानण्यावर..
वेग नक्कीच मंदावलाय
जगाच्या भीतीचा
हृदयाच्या धडधडीचा
डोळ्यातून पाणी वाहण्याचा
आंधळ्या विश्वासाचा
डोळस अहंकाराचा..
जग खूप सुंदर दिसतंय
जेव्हा जातेय जगाच्या वेगाने
मुंगीसोबत लहान पावलं
उंच भरारी गरुडाच्या वेगाने
स्वप्नांच्या हरणांचा सुसाट वेग
अंतरी शांतता संथ वेगाने...
विनिता धुपकर
Comments