Search
वारा
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
रंगांची नभी स्वैर उधळण
आसमंत झुलवित सारा
रोज नवी शाल पांघरूनी
हृदयी सूर झंकारे वारा..
प्रभात केशरी किरणांनी
जोगिया आळवीत दूरवरी
सुवर्ण तांबडा सडा शिंपुनी
जागवीत हासऱ्या धरा
हृदयी सूर ......
पित सुवर्ण उष्ण वारे
वृंदावनी सारंगी गावे
हळूहळू धुंदी चढताना
पूर्वी लाही फुटल्या ताना
हृदयी सूर.......
उन्हे रेशमी लाली गाली
संध्या पुरिया गाऊ लागली
निघताना रंगी रेंगाळली
दूर मारवा मंद स्वरा
हृदयी सूर .......
क्षितिजावरती निळी सावळी
बागेश्रीची रात्र उतरली
घट्ट लपेटून चंद्रकलेला
लुकलुकती लक्ष सूरतारा
हृदयी सूर .....
सप्तसूरांनी गाई वारा
सप्तरंगी फुलवी पिसारा
आनंदाचे जीवन गाणे
श्वासांमधला गंधित शहारा
हृदयी सूर झंकारे वारा..
विनिता धुपकर
Comments