Search
शांत
- Vinita
- Mar 18, 2020
- 1 min read
आज थोडे थांबून, हरवलेले मन शोधावेसे वाटते
पुन्हा नदीतीरावर, शांततेला बोलवावेसे वाटते..
अपेक्षांच्या डोंगराचा, असह्य भार पेलवेना आता
नदीत त्यास विसर्जून, हलके पीस व्हावेसे वाटते..
पुन्हा नदीतीरावर...
नको रात्रीच्या चिंता, आणि मनातले अशांत गजर
आकाशाकडे पहात, चांदण्यांशी बोलावेसे वाटते..
पुन्हा नदीतीरावर..
गेल्या क्षणांची खंत, येणा-यांची भेडसावते चाहूल
आज हातातल्या क्षणांना, मुठीत पकडावेसे वाटते..
पुन्हा नदीतीरावर..
आकाशाला हात धरून, धरतीवर आणावेसे वाटते
आज मला माझ्यावर, थोडेसे प्रेम करावेसे वाटते...
पुन्हा नदीतीरावर, शांततेला बोलवावेसे वाटते..
आज थोडे थांबून, हरवलेले मन शोधावेसे वाटते
विनिता धुपकर
Comments