top of page
Search

सवय

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

कुठूनशी येतेस तू नि

गळामिठी मारतेस

तना मनाला

बेमालूम गटवतेस..

नाचू लागतात पेशी

सा-याच तुझ्या तालावर

हरलेली बुद्धीदेखील

अक्कल अडकवते खुंटीवर..

मी माझी नसतेच

असते फक्त कठपुतली

परिस्थितीच्या दो-यांवर नाचणारी

सवयींची बाहुली

नाचता नाचता दमते कधी

वाटते आता बंड करावे

तोडून सगळ्या दो-यांना

पुन्हा नव्याने जगावे..

नवा चेहरा नवी वस्त्रे

नव्या जोमाने नाचू लागते

पुन्हा दो-याच नाचवत असतात

सवयींचीच मी सवय असते..

अंतर तुला देऊ कशी

माझ्यातलीच झालीस बाई

सुंभ जळला तरी गं

पीळ जळत नाही..


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page