Search
हेवा
- Vinita
- Mar 18, 2020
- 1 min read
हेवा वाटतो त्याचा..
संकटांच्या नजरेला
नजर ज्याची भिडे
तुफानाला कवटाळून
पाऊले त्याची पुढे..
एकवटून शक्तीला
उंचावलेल्या मुठीचा
हेवा वाटतो त्याचा..
सूर्याच्या किरणांना
खेळवतो जो अंगावरी
दुःखितांची घरे सावरून
देणारा हात पुढे करी
आयुष्य भिजवी जो
झेलून पाऊस गारांचा
हेवा वाटतो त्याचा..
नदीचा जीव वाचवून
पाण्यासाठी लढतो
सूर्याशी न भांडता
त्याची ऊर्जा वेचतो
लक्ष झाडे लाऊन
निसर्गाशी इमान राखण्याचा
हेवा वाटतो त्याचा..
मोह नाही लोभ नाही
राग नाही चीड नाही
समाधान चेहऱ्यावर
मागणे कधी काही नाही
जगण्यावर प्रेम त्याचे
द्वेष ना मनी कुणाचा...
हेवा वाटतो त्याचा...
विनिता धुपकर
Comments