top of page
Search

आवाज

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

मी आहे आवाज

कंपनलहरींचा संच...

कानाच्या तरल पडद्यावर आपटून

बहरलेल्या ध्वनीलहरींचा मंच...


कधी मी असतो

बीजेचे नवांकूर

तान्हुल्याचा हुंकार...

गात्रांतून पाझरते

मातृत्व तिच्या

देऊनी प्रतिहुंकार...


कधी हसतो मी

कधी रडतोही

कधी कधी रूसतो...

बहरतो ऋतुंसवे

शहारतो, नादावतो

केव्हातरी स्थिरावतो...


कधी गार वारा

रातकिड्याची किरकिर

नदीची खळखळ...

सागराचे तांडव

लाटांचा थयथयाट

पानांची सळसळ...


पक्षांचा किलकिलाट

कोकिळेचे गाणे

नजिकच्या झाडावर...

बासुरीचे सूर

वीणेचे झंकार

दूर खूप दूरवर...


कधी मी आतला आवाज

कानांना ऐकू न येणारी

मनाची साद...

ह्रदय ऐकते तो आवाज

ह्रदयाच्या ठोक्यांचा

लयतालावर

मूक प्रतिसाद....!


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page