top of page
Search

उशीर

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

चांदण्याच्या कानात कुजबुजणे राहून गेले

मी मला माझ्यातून शोधायचे राहून गेले...


मी जरी पहिले क्षितिजा, पाय होते माझे घरी

उंबरा ओलांडून झेप घेणे राहून गेले..

मी मला माझ्यातून...


सूर्य आडून पहिला होता एका खुळ्या ढगाने

सुवर्ण किनार ल्याली, मात्र लखलखणे राहून गेले...

मी मला माझ्यातून ...


हिरवी शेते हिरवी झाडे, पांघरली हिरवी शाल

वाऱ्याबरोबर शर्यत लावून, रानात पळणे राहून गेले..

मी मला माझ्यातून ...


पर्जन्यसरी बरसताना नखशिखांत भिजले

ओथंबल्या मनाने छत्री भिरकावणे राहून गेले...

मी मला माझ्यातून...


झाला का उशीर, जाईल का काळ थोडा मागे..?

काळ सांगे चल पुढे, कर पुरे, स्वप्न जे राहून गेले..

मी मला शोधित आहे, जे कधी राहून गेले...


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page