Search
कातर
- Vinita

- Mar 3, 2020
- 1 min read
पहाटेचे सोनेरी ऊन
नखशिखांत बागडले
निरागस कोवळे मन
बालपण उगवते झाले
दुपारचे कठोर ऊन
सावली शोधू लागले
खडतर जीवनाला
चटके बसू लागले
तरीही खुणावत होती
सूर्याची तेजस्वी किरणे
आता थांबणे नाही
वाट सरत जाणे..
प्रकाशाचे तेज पिऊन
वाट प्रज्वलित झाली
अकस्मित तेजमय किरणे
क्षितिजावर लोपू लागली ..
सांजवेळ भितर कातर
पानांची सळसळ थरथर
सावळ्या हळव्या सावल्या
दिसे अंधुक वाट धूसर..
संध्या बिलगून चांदण्यांना
रात्रीच्या कुशीत शिरली
कातर कातर तो क्षण
चंद्राला मिठी मारली..
चंद्राचा पाठीवर हात
अडकला गं काळ चक्रात
रात्रगर्भातून जन्मे प्रभात
होण्या विलीन सायंकालात..
विनिता धुपकर
Comments