Search
किरण
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
पहाट होता उन्हे निघाली
घेऊन किरणे लक्षावधी
रविराजाची आज्ञा झाली
उजळून या अवनी अवघी
किरणे काही का रेंगाळली
गुजगोष्टी करी मेघांशी
मेघ अडविती थांबा थोडे
उन्हात भिजू दे आम्हांसी
धुक्यालाही हुडहुडी भरोनी
वाट बघे ते किरणांची
हक्काने मग अडवून त्यांना
शाल पांघरे उन्हाची
काही किरणे झाडांमध्ये
गुंतली पानांच्या गुंत्यात
गुंता मग सोडविताना तो
सूर्यही दमला आकाशात
किरणे घेऊन अंगावरती
फुले नाचती हर्षाने..
रंगीत वस्त्रे उठून दिसती
स्वच्छ सुरेख प्रकाशाने
पक्षी गाती प्रकाश गाणी
पंख पसरवूनि सोनेरी
सरिता सुवर्ण तुषार उडवीत
नाचवीते गं पाण्यावरी
धरती सारी चैतन्याने
पिऊन घेई किरणांना
असेच असू दे प्रेम तुझे रे
भास्करा दयाघना..
विनिता धुपकर
Comments