ध्वनी
- Vinita

- Feb 17, 2020
- 1 min read
माणसाच्या जीवनाचे अपरिहार्य अंग म्हणजे ध्वनी. 'कान' या ध्वनीला आपल्यापर्यंत पोहोचवतो. कानाची रचना निसर्गाने खूप विचार करून केलेली दिसते. कानाला नैसर्गिक फिल्टर्स असतात. त्यामुळे तो ध्वनी modulate करूनच आपल्यापर्यंत पोहोचवतो. परंतु कानाच्या काही मर्यादा आहेत. कुठलाही अवास्तव प्रमाणापेक्षा जास्त ध्वनी, जो माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतो आणि दैनंदिन जीवनात अडथळा आणतो, त्याचेच नाव 'ध्वनिप्रदूषण'.
ध्वनी प्रदूषण हे वाहतूक, औद्योगिक उपकरणे, विमाने आणि उत्सव या कारणांमुळे होते. गम्मत म्हणजे ध्वनी प्रदूषण हे सापेक्ष आहे. जर तुम्ही डी जे च्या आवाजात दांडिया नृत्य करत असाल तर त्या आवाजाचा तुम्हाला त्रास होत नाही. परंतु शेजारच्या बिल्डिंग मधल्या काकांना त्याचा त्रास होतो.
ध्वनी हा डेसिबल मध्ये मोजतात. माणसाचा कान ५५-६० डेसिबल पर्यंत आवाज सहन करू शकतो. त्याच्या वर त्याला त्रास होऊ लागतो. दवाखाने, शाळा, महाविद्यालये हे 'ध्वनिप्रदूषण निषिद्ध' भाग घोषित केलेले आहेत.
ध्वनी प्रदूषणामुळे कानाला दडे बसणे, ब्लड प्रेशर वाढणे अथवा थकवा येणे असे परिणाम होतातच . परंतु दोन प्रकारचा बहिरेपणाही येऊ शकतो. तात्पुरता बहिरेपणा आणि कायमचा बहोरेपणा. मोठा आवाज एकदम ऐकल्याने दडे बसून तात्पुरता बहिरेपणा येऊ शकतो. पण मोठया आवाजाच्या सानिध्यात सातत्याने राहिल्याने (उदा. कारखान्यामधल्या मशीनचा आवाज) कायमचा बहिरेपणा येऊ शकतो.
देवाने दिलेल्या या छोट्याशा पण सुंदर इंद्रियाची काळजी घेऊ या व आपल्यामुळे इतरांना ध्वनीचा त्रास होणार नाही असे वागू या...!
विनिता धुपकर
Comments