Search
अनामिक
- Vinita

- Mar 3, 2020
- 1 min read
एक अनामिक सहप्रवासी
अचानक वाटेवर भेटलेली
एक अनाम अंतरिक ओढ
जणू जन्म जन्मांची सहेली
रोज थोडेसे थांबून मी
तिला वेळ देऊ लागले
आताशा जरा मागे वळून
मीही थोडी पाहू लागले
इतकं जगून झालं पण
जगायलाच वेळ दिला नाही
जगतो आहोत कशासाठी
कसलाच मेळ जुळला नाही
खुळ्यासारखे धावत होतो
दिशा कधी कळलीच नाही
मनाची पावले का कधी
हृदयाकडे वळली नाहीत
आता दिसते लख्खआकाश
ऐकू येतो किलबिलाट..
फुले हसून डोलत असता
कानात घुमतो ब्रह्मनाद..
कोण तू, कुठून आलीस
जाणार कुठे, माहित नाही
तुझा हात हाती घेऊन
सौंदर्याला मी सजवू पाही
कशी होऊ गं उतराई
अर्थ उमगला असण्याचा
अखेरच्या मी श्वासा आधी
श्वास घेतला जगण्याचा..
विनिता धुपकर
Comments