top of page
Search

अलंकार

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

Updated: Mar 12, 2020


किती अलंकार

परिधानले आहेत अंगावर

चमकती त्याच्या डोळ्यात

ज्याची नजर माझ्यावर..

भाळावर नक्षीदार टिकली

भांगामध्ये बिंदी हसे

विद्यालंकार शीरावर विराजून

मिरवती पदव्यांची पिसे..

नाकातल्या नथीला राग

अपमानाने होई लाल

कानामधले डूल म्हणती

ऐक चांगले, रहा खुशाल..

गळ्याभोवती ल्याले तन्मणी

ताठ मानेने जगत रहा

मंगळसुत्री काळे मणी

कधी न लागो नजर तुला..

पादकांमधला मोती डुलतो

गाता असू दे तुझा गळा

मोहक वाणी सुंदर गाणी

सप्तसुरांचा आनंदमेळा..

खणखण वाजे हाती कंकण

कलालंकार प्रिय माझा

या हातांनी, या बोटांनी

घडत राहो कला पूजा..

कंबरपट्टा हळूच सांगे

रडवू नको शरीराला

नित्य घालणे सूर्यनमस्कार

सुंदर दिसू दे बांध्याला..

छनछन वाजे पैंजण पायी

पाऊल टाक मुली जपून

खाच खळगे रस्त्यामधले

पुढे पुढे जा अजमावून..


विनिता धुपकर



गोडवा


 
 
 

Comments


bottom of page