आठवणींचे मोती...
- Vinita

- Mar 3, 2020
- 2 min read
चार महिन्यांचे वास्तव्य आटोपून आम्ही अमेरिकेतून भारतात परत निघालो. पासपोर्ट, तिकिटं, ब्यागांचे वजन अशी टेंशन्स पार करत विमानात बसलो. आता भारताचे वेध लागले होते. घर साफ करणे, मैत्रिणी, घरकामाच्या बायका, ऑफिसची कामे, असे बरेच काही डोळ्यासमोर येत होते. मुख्य म्हणजे घड्याळापासून झोपेपर्यंत सगळेच १८० डिग्रीमध्ये फिरवावे लागणार होते. माणूस पूर्ण फिरला तरी विचार, नाती आणि आठवणी मात्र तशाच राहतात.
विमानात थंडीला तोंड देण्यासाठी मी माझी नेहमीची शाल काढली आणि कानात आवाज घुमला.. आज्जी आपण शाल शाल खेळू या? आर्णा, माझी नात, तिची आठवण यायला सुरवात झाली. तिने खोटे खोटे रडायचे आणि मी तिला "ओ रे बेबी, Are you feeling cold? म्हणत मांडीवर घेऊन शाल पांघरायची. असा आमचा खेळ चाले. "आबा आज्जी, आपण peek -a -boo खेळू या का? म्हणजेच आपला लपंडाव. आबांनी लपायचे आणि आज्जी-नात "where is आबा' म्हणत आबांना शोधणार.. तिथेही रोज चांदोबा झाडामागे लपायचा...फक्त ते झाड लिंबोणीचे नसून Cypress Tree होते आणि moon was hiding..
मी काम करत असले कि बाईसाहेब बोटाला धरून "Come on आज्जी" म्हणत ओढून नेत असत. शाळेतून घरी आल्यावर स्वतःचे स्वतः जेवण्याचे सगळे अमेरिकन नियम धाब्यावर! आज्जीने भरवल्याशिवाय जेवण होत नसे. सगळे लाड करून घेतले. आज्जी आबांचे फोन सोफ्यामागे टाकणे, चष्मा फेकून देणे (कारण तो लाड करताना मध्ये येतो), अंगावर उड्या मारणे, आबांबरोबर ट्रेन ट्रेन करत घरभर पळणे, आज्जी दिसली की शाळेत टीचर चा हात सोडून धावत येऊन बिलगणे ..अशा अनेक आठवणी एकामागोमाग आल्या. " तिला आम्ही लाडावून ठेवली आहे (बिघडवली आहे)" अशी माझी मुलगी पूजा तक्रार करीत असे. पण आज्जीने लाड नाही करायचे तर कोणी करायचे? आज्जी आणि नात दोघीही मज्जा करायच्या.
झोपताना चिऊ काऊ च्या गोष्टी होत असे. थोडेसे बदल करून गोष्ट तीच. Crow comes to sparrow's nest..knocks the door & says, "चिऊताई, चिऊताई, open the door.. "
जगाच्या पाठीवर कोठेही जा..आज्जी-आबा आणि नातीचे नाते असेच घट्ट..! शब्द बदलले तरी गाणी-गोष्टी त्याच..! आठवणींचे मोती वेचून एका धाग्यात बांधायचा हा प्रयत्न...पण बांधून ठेवले तरी उद्या पुन्हा एखादा मोती आणि मग नकळत त्यामागोमाग अनेक मोती घरंगळत मनाची अख्खी खोली व्यापून टाकतील...
विनीता धुपकर
Comments