Search
झोपाळा
- Vinita

- Mar 18, 2020
- 1 min read
प्रत्येक घरी असावा, एक नक्षीदार झोपाळा
सुख-दुःखाच्या हिंदोळ्यावर, झुलणारा जिव्हाळा
आबांचा पेपर तिथेच, अन् आजीचे मंत्रपठण
भाजी निवडते आई, झोपही माझी त्यावरच
दिवसभर असतो त्याचा, कौतुक सोहळा..
प्रत्येक घरी असावा, एक नक्षीदार झोपाळा..
नात्यांच्या मजबूत कड्या, घाली हातात हात
चार साखळ्या तोलती, साऱ्या घराचा भार
नक्षीचा चौरंगी पाट, सावरुन घेई गोतावळा
प्रत्येक घरी असावा, एक नक्षीदार झोपाळा..
झुलताना झोपाळा, कुरकुरे बेसुरात
मात्र आनंदाची सम, अचूक गाठे तालात
अंतरीचा कळवळा, आणि प्रेमाचा उमाळा
प्रत्येक घरी असावा, एक नक्षीदार झोपाळा
विनिता धुपकर
Comments