ठिणगी (2)
- Vinita
- Feb 17, 2020
- 1 min read
१९९३ - १९९४ चा काळ. मी तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा कॉलेज मध्ये जाऊन M.Tech. आणि तेही IIT Mumbai येथे करण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी चौथी मध्ये होती. पण हे धनुष्य पेलायचे ठरवले. माझे सासू सासरे आणि नवरा यांनी पूर्ण सहकार्य करायचे ठरवून मला प्रोत्साहित केले. मी कॉलेज मध्ये रवाना झाले.
पहिल्या दिवशी क्लासमधील २० जणांमध्ये मी एकटी मुलगी होते. बाकी सगळी मुले आणि सारेच माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी लहान, हुशार आणि एनर्जेटिक होते. पहिल्यांदा मला खूप टेन्शन आले. अगदी रडू सुद्धा यायचे. आपण येथे येऊन चुकलो तर नाही ना असे वाटू लागले.
एके दिवशी लॅबोरेटोरीमध्ये एक मुलगा म्हणताना ऐकले. .... अशा मुली येऊन जागा का अडवतात?
बस...! हीच ती ठिणगी... ! हे ऐकून मी अगदी पेटून निघाले. ठिणगीने माझ्यातल्या आत्मविश्वासाला मोठे आव्हान दिले. मग सुरु झाला एक स्वतःला शोधण्याचा आणि सिद्ध करण्याचा प्रवास. एक महिन्यातच सगळी मुले माझ्या नोट्स वापरू लागली. नोट्स च्या xerox copies परीक्षेच्या अभ्यासाला वापरल्या जात होत्या. हळूहळू माझ्याबद्दलचे मत बदलत गेले.
आणि सरते शेवटी मी त्या सर्वाना फर्स्ट रॅंकमध्ये येऊन दाखवले.
एखादी ठिणगी माणसाला किती सक्षम बनवते त्याचा माझा अनुभव.
विनीता धुपकर
Comments