top of page
Search

दवबिंदू

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

दवबिंदू जरी विसावलेले

एका हिरव्या पानावर

थोडेसे ते भांबावलेले

तोल सावरे वाऱ्यावर


पान जरा हलले वाऱ्याने

दवबिंदूही थरथरले..

नकोस चिंता करु तू मित्रा

जवळी पानाने धरले..


कोण पाहूणा आज अवतरे

कळी विचारी डोकावून..

सुंदर मोती आला आहे

भेटाया आकाशातून..


अलवार तयाच्या स्पर्शातून

कळी खुलली हृदयातून..

मोती चैतन्याने चमके

सोनेरी मुकुट घालून..


नका लावू तुम्ही जीव फुलांनो

नको गुंतणे तुमच्यात..

आता तुमचा निरोप घेणे

सोडा धरलेला हात..


आभाळातून जन्म घेतला

धरती घेईल सामावून

वाटेवरचा प्रवास सुंदर

करितो दवबिंदू होऊन..


क्षणभंगूरच जीवन आपुले

बिंदू आदि-अंतामधला..

सुरेख संपन्न पृथ्वीबिंदू

अवकाशाने झेललेला..


विनिता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page