top of page
Search

प्रकाश

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

मला भावतो प्रकाश

मिणमिणता ज्योतीचा

काळोखाला दिपवून

दिसणाऱ्या आशेचा


मला भुलवतो प्रकाश

जाग्या चंदेरी रात्रीचा

चोरून ढगाआडून

दिसलेल्या चांदणीचा


मला भिजवतो प्रकाश

पावसानंतरच्या उन्हाचा

दूर आकाशातल्या

सप्तरंगी इंद्रधनूचा


मला भिडतो प्रकाश

दिव्यांच्या माळांचा

अंधारी मने उजळून

आतुरलेल्या उषःकालाचा


मला भारावतो प्रकाश

सावल्यांमधील उन्हाचा

मेघाने अडवलेल्या

मग्रूर किरणांचा..


मला भिववतो प्रकाश

पेटलेल्या मशालींचा

जळत्या जाणिवांचा

मेलेल्या संवेदनांचा


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page