Search
प्रसन्न
- Vinita

- Mar 17, 2020
- 1 min read
देवळात देव शोधणे
जमलेच नाही मला
गाभाऱ्यातील देव तर
गुदमरलेला वाटला..
अंधाऱ्या खोलीतला
माणसांच्या गर्दीतला
मोकळ्या श्वासासाठी
आसुसलेला दिसला..
दिसली मात्र अमाप
भाबडी श्रद्धा ओसंडताना..
आपल्या चिंता नि ओझी
इकडून तिकडे देताना..
दर्शन देता देता तो
रडू त्याचे लपवत होता..
तुमच्यातल्या मला एकदा
हाक मारा म्हणत होता..
अचानक मी पाहिला देव
तिच्या प्रसन्न चेहऱ्यात...
देणाऱ्या हातात आणि
चमकणाऱ्या डोळ्यात..
आनंदाच्या महिरपीत
हासलेल्या ओठांत..
केस कापलेल्या डोक्यावर
मिरवणा-या कळसात..
तिच्या घनदाट कुंतलांचे
दान केले होते तिने..
कॅन्सर रुग्णांना सुंदर दिसून
जगण्यासाठी विश्वासाने..
माझा दिवस आज
सोन्याहून पिवळा होता
एक प्रसन्न देव
मला प्रत्यक्ष भेटला होता
विनिता धुपकर
Comments