Search
पदराचे पदर
- Vinita

- Feb 17, 2020
- 1 min read
फॅशन शो च्या व्यासपीठावर
लाजत मुरडत चाल तिची
हलतो डुलतो पदर तिचा अन्
नजाकत पहा पदराची..
लग्नामध्ये गाठ बांधली
पदराने त्या शेल्याला..
मिळे सोबती आयुष्याचा
पदर घट्ट या बंधनाला..
बाळाचा मग टाहो कानी
भूक अनावर तान्ह्या झाली
तिने घेतले त्यास लगबगी
मातृत्वाच्या पदराखाली
दुडूदुडू धावे बाळ अंगणी
धरुनी पदर इवल्या हाताने
तिच्या तिथे असण्याची ग्वाही
दिली त्यास होती पदराने..
छोटी छकुली झाली मोठी
हात पुसे ती, त्या पदराला
ताट तिचे मग पुसतानाही
पदरच येई बघ कामाला..
आज तिच्या पदराने पुनरपी
अश्रू पुसले अगतिक होऊनी..
छकुलीनेही गाठ बांधिली
पदर निघाला सून होऊनी़..
विनिता धुपकर
Comments