Search
संगीत
- Vinita

- Mar 3, 2020
- 1 min read

ईश्वराची आराधना, ओंकाराचा नाद
संगीत एक उत्सव, सप्त सुरांची आरास,
रात्रीची शांतता, प्रभातीचा प्रकाश
संगीताने व्यापले अवघे आकाश
सागराचा षड्ज लाटांच्या भात्यातून
धीर गंभीर स्वर खर्जाच्या खोलीतून
रेतीवर निनाद रिषभ किनाऱ्यावरी
दूर गंधार गलबताच्या हिंदोळ्यावरी
मध्यम सळसळे हिरव्या पानांतून
पंचम कोकिळेच्या मधुर गळ्यातून
धैवत वाहे खळाळत्या झऱ्यातून
निषाद उमटे आभाळ निळाईतून
कोमल निषाद बाळाच्या रडण्यात
आईचे ओरडणे कोमल गंधारात
पहाटेची भूपाळी शांत भैरवातून
कोमल रिषभ आणि धैवतातून
तीव्र मध्यमाचा स्वर माझ्या स्पंदनांत
यमन कल्याण मनाच्या अंतरात
संगीत जीवन, संगीत समृद्ध श्वास,
संगीत कणाकणांत, जगण्याची आस
विनिता धुपकर
Comments