Search
स्वर्ग
- Vinita

- Mar 17, 2020
- 1 min read
स्वर्गात जायचंय म्हणे
सूखांच्या राशी आहेत
पूण्ण्याच्या मानक-याचं
ते नक्की भाकित आहे
पायघड्या असतील तिथे
असेल का हिरवी पायवाट?
ढगांच्या कापसाची गादी
पण असेल का मृद्गंधाचा थाट?
मिळतील का तिथे मला
माझ्या गाण्याचे सूर?
सजलेल्या अप्सरांना
झेपेल का माझा नूर..?
असतील का पुस्तके
आणि लेखणी लिहायला?
रंग माझे असतील का
कुंचल्यातून उतरवायला?
हरवेन मी चमकत्या
सुखासीन प्रकाशात
शोधत राहीन सैरभैर
मलाच मी आकाशात..
नको मला तो स्वर्ग
इथेच मी बरी आहे
जमीनच माझा स्वर्ग
पण एकदा त्यागणे आहे..
विनिता धुपकर
Comments